सेवासदन प्रशालेत आषाढी एकादशी निमित्त अभंगवाणीतुन साक्षरतेचा कार्यक्रम संपन्न


सेवासदन प्रशालेत आषाढी एकादशी निमित्त अभंगवाणीतुन साक्षरतेचा कार्यक्रम संपन्न सोलापूर – येथील सेवासदन प्रशाला येथे अंभगवाणी व दिंडी कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. विठ्ठल रुक्मिणीचे पूजन प्रमुख पाहुणे गायक प्रशांत देशपांडे, सेवासदन संस्थेच्या सचिव वीणा पतकी, कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी मीरा जमादार यांच्या हस्ते करण्यात आले.

विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचे पूजन करून वारी टाळ मृदुंगाच्या गजरात निघाली. विठ्ठलाचा नामघोषात भक्तीमय वातावरणात इयता १० वी तील विद्यार्थिनी वारकऱ्याच्या वेषात, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाई, संत मुक्ताई, संत नामदेव यांच्या वेषात वारीत सहभागी झाल्या होत्या. इयत्ता ५ वी तील विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन, हाती टाळ, मृदंग, आणि वीणा घेऊन विठ्ठल रुक्मिणी च्या नाम घोषित गोल रिंगण करून फेर धरला शिक्षक बंधु भगिनी देखील वारकरी बनून हातात साक्षरतेचे महत्त्व सांगणारे फलक ‘सांगे ज्ञाना तुका, झाला उशीरा तरी शिका,’ असा संदेश, स्वच्छतेचा संदेश, पर्यावरण संरक्षणाचा संदेशाचे फलक घेऊन वारीत सहभागी झाले होते. स्मिता कोर्टीकर व रोहिणी निराळे यांनी नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत’ वारी साक्षरतेची’ हा फलक हाती घेऊन सर्वांसाठी शिक्षण व प्रौढ साक्षरता ‘साक्षरतेची वारी हरीच्या दारी’नुसार सर्वांनी साक्षर होऊन विकसित भारत निर्माण करावा असा संदेश दिला.

पाहुण्यांचा परिचय अश्विनी वाघमोडे यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या सत्राचे सूत्रसंचलन मीरा केंद्रे यांनी केले. दुसऱ्या सत्रात अभंगवाणी या सुश्राव्य गीत अभंगाचा कार्यक्रम झाला. इ. ५ वी तील स्तुती कुलकर्णी या विद्यार्थिनीने’ मंदिरात अंतरात’, हे गाणे सादर केले. ‘चंद्रभागेच्या तिरी’ हे गीत वीरा रजपूत, प्रांजल पोतदार, आदिती शिंदे, शर्वरी भोसले, भाग्यलक्ष्मी दोडमणी, शांभवी जोशी यांनी सादर केले. ‘रखुमाई रखुमाई’ हे गाणे श्रद्धा भोसले, श्रावणी सावंत यांनी सादर केले.’ विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत’, ‘केशवा माधवा’ ही अभंगरचना समूह स्वरात प्रांजली पोतदार व अंजली शिंदे यांनी सादर केली. संगीत साथ व मार्गदर्शन गायनशिक्षक विलास कुलकर्णी यांनी केले. ‘कैवल्यवारी ‘या गाजलेल्या अल्बममधील ‘येतो परतून देवा माझी आठवण ठेवा’ वर्षा हुंजे लिखित गीत गायनशिक्षक विलास कुलकर्णी यांनी गायलेले असून त्यांनीच ते आषाढी एकादशी निमित्त सादर केले, ‘माऊली माऊली’ हे गाणे विलास कुलकर्णी यांनी सादर केले. प्रमुख पाहुणे प्रशांत देशपांडे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला विठ्ठल भक्ती म्हणजे कर्म करत करत समाजसेवा करणे समाजातील सर्वांशी माणुसकीच्या नात्याने वागणे असा संदेश त्यांनी दिला. ‘कानडा राजा पंढरीचा’ व भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे गीत प्रमुख पाहुणे प्रशांत देशपांडे यांनी सादर केले.

कार्यक्रम प्रसंगी सेवासदन प्रशालेतील शिक्षक प्रतिनिधी मीरा जमादार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडाप्रमुख ज्ञानेश्वर काळे, ध्वनी संयोजक रेवणसिद्ध कट्टे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन अश्विनी वाघमोडे यांनी केले.