तरुणाईला आता गरज सायबर संस्कारांची – आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर


सोलापूर दि.१८ - तीस ते चाळीस  वर्षांपूर्वी ठरावीक वर्गच संगणकाचा वापर करत होता. परंतु सध्या संगणक वापर सगळीकडे सर्वमान्य झाला आहे. त्यामुळे भारत जगात डिजीटल उपकरणे वापरण्यात अग्रेसर आहे. सध्या अनेकांकडे उपकरणे आहेत. परंतु ती कशी वापरावीत याचे प्रशिक्षण त्यांना कोणीही देत नाही. त्यामुळे तरुणाईला आता सायबर संस्कारांची गरज असल्याचे स्पष्ट मत आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.

पुणे सेवासदन संस्था शाखा  सोलापूर यांच्या वतीने शिक्षक आणि विद्याथिनीसाठी डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा शिक्षणावर प्रभाव या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डॉ. शिकारपूरकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव विणा पत्की, उपाध्यक्ष राजीव प्रधान, विद्या लिमये डॉ. श्रीकांत येळेगावकर, लक्ष्मीकांत गवई, यांची प्रमुख उपस्थिती होती.

नियमांची आवश्यकता
———-–—–
डॉ. शिकारपूर म्हणाले, संगणक किंवा मोबाईल कसा वापरावा याचे कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे अनेकजण स्वप्रशिक्षितच असतात. परंतु हे स्वप्रशिक्षण फसवे असू शकते. यातून अनेकजण सायबर गुन्ह्यांना बळी पडलेले पाहायला मिळतात. या क्षेत्रात काही नियमांची आवश्यकता आहे. उदा. मोबाईल वापरण्यासाठी देखील किमान २० तासांचा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्या वेबसाईटचा वापर करावा, काय पाहू नये, वेगवेगळ्या बेटिंग अ‍ॅपचा वापर करावा का, मोबाईलवर किती वेळ गेम खेळावी यांसह सजग साक्षर होण्यासाठी आवश्यक बाबींचा समावेश असणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी काय करावे?
——–——-
संगणक क्षेत्रात विविध गोष्टींवर संशोधन सुरू आहे. अनेक गोष्टींमध्ये अ‍ॅटोमेशन हा प्रकार येईल. सर्व गोष्टी सॉफ्टवेअर आणि संगणकाच्या माध्यमातून होतील. यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती जोपासायला हवी. पुणे शहरामध्ये शेती नाही तरीदेखील शेतीसंदर्भातील शिक्षण देणारी संस्था आहे. ज्याठिकाणी आयटी उद्योग आहेत. त्याठिकाणीच आयटीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्याठिकाणी ज्याप्रकारचे उद्योग आहेत, तशाच प्रकारचे शिक्षण दिले गेले तर ते फायदेशीर ठरणार आहे.

चॅट जीपीटी म्हणजे काय ?

या टूलचा वापर करून साहित्यनिर्मिती करता येते. हव्या त्या कवितादेखील करता येतात. कारण आर्टिफिशीयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये कंटेटची निर्मिती झाल्याचे दिसून येते. प्रादेशिक भाषांमध्ये सध्या चॅट जीपीटीचा वावर मर्यादित आहे. इंग्रजीमध्ये सध्या याचा मोठा वापर होत आहे, प्रादेशिक भाषेतदेखील वापर वाढणार आहे. यातून अनेक गुंतागुंतीची आव्हाने निर्माण होणार असल्याचेदेखील डॉ. शिकारपूर यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाहुण्यांचा परिचय आणि आभार डॉ.अंजली शिरसी यांनी केले .
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. शीला मिस्त्री संचालक मा.पद्माकर कुलकर्णी, शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ .नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.