सेवासदन प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम संपन्न


गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. त्यानिमित्त सेवासदन प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .प्रशालेचे गायन शिक्षक श्री. विलास कुलकर्णी सर व विद्यार्थिनींनी तुकाराम महाराजांचा अभंग ‘गुरु चरणी ठेविता माथा ‘सादर केले. इयत्ता दहावी सुरजाबाई तील विद्यार्थिनीनी ‘गुरु: ब्रह्मा गुरुर्विष्णु’ गाण्यावर कथ्थक नृत्य सादर केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा .मुख्याध्यापिका सौ.राजेश्री रणपिसे यांनी केले .प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे कुंभार मडक्याला आकार देण्याचे काम करतो, तसेच गुरु हा शिष्याच्या आयुष्याला आकार देण्याचे काम करत असतो. ‘आचार्य देवो भव ‘ही आपली परंपरा त्यानुसार आज आपण गुरुपौर्णिमा साजरी करीत आहोत.

प्रमुख पाहुणे प्रा.नरेंद्र काटीकर व सेवासदन संस्था सचिवा सौ .वीणा पतकी यांच्या हस्ते आद्यगुरू श्री .व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .प्रमुख पाहुणे श्री. नरेंद्र काटीकर यांची ओळख श्रुती मोहोळकर यांनी करून दिली .प्रमुख पाहुणे श्री .नरेंद्र काटीकर व सचिवा वीणा पतकी यांचा सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .राजेश्री रणपिसे यांनी केला .ज्येष्ठ शिक्षक श्री .कट्टे व शिक्षिका सौ. लामतुरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेतील विद्यार्थिनी कु.हर्षदा आवारे व कु. राजनंदिनी खुर्द यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व भाषणातून मांडले .श्री .नरेंद्र काटीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुरु म्हणून केला गेला पाहिजे डाटा ,इन्फॉर्मेशन, ऑपरेशन आणि विझडम यांचा वापर आयुष्यात केला गेला पाहिजे. व्यक्तिमत्व घडताना संस्काराला खूप महत्त्व आहे.

नववी मेरी कोम मधील विद्यार्थिनींनी तयार केलेली शुभेच्छापत्रे शिक्षकांना भेट देण्यात आली .प्रशालेतर्फे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतरांचा सत्कार श्रीफळ देऊन करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी सेवासदन संस्था सचिवा सौ. वीणा पतकी, मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे ,उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ .स्वाती पोतदार ,शिक्षक प्रतिनिधी श्री .सतीश घंटेनवरु उपस्थित होते.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मीरा जमादार यांनी केले.