सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य अभिभाषणाने अकरावीच्या विद्यार्थिनींचे स्वागत


पुणे सेवासदन संस्था, शाखा सोलापूरच्या सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य अभिभाषण आणि अकरावीच्या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ हे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थिनींनी अकरावीच्या विद्यार्थिनींचे वर्ग सजावटीद्वारे तसेच गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत केले.


कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. पद्मकुमार उपाध्ये, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मधुरा गोगटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संगीत शिक्षक प्रा. विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विषयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री पद्मकुमार उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी आपल्या अभिभाषणातून “नवीन स्वप्न उराशी बाळगून महाविद्यालयात प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे स्वागत केले. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय हे नेहमीच कटीबद्ध आहे. यासाठी विद्यार्थिनींनी गुरुजनांचा आदर, सन्मान, शिस्त, कठोर परिश्रम हे गुण अंगी बाळगले तर सर्व विद्यार्थिनी निश्चितच आपले ध्येय गाठतील” अशा शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनींच्या पालकांसाठी पालक शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधींची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या शैक्षणिक वर्षातील पहिल्या पालक सभेत प्राचार्यांनी उपस्थित पालकांना महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम, संस्थेचा इतिहास, संस्थेच्या उज्वल यशाची परंपरा याबाबत माहिती देऊन महाविद्यालयातील विविध कार्यपद्धतीची ओळख करून दिली. शिक्षक व पालक यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास घडू शकतो. यासाठी शिक्षकांबरोबर पालकांनी देखील आपल्या पाल्याच्या उत्तम प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. मधुरा गोगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर प्रा. सविता मादळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.