सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील भक्ती कल्पवृक्ष हिचे जेईई परीक्षेत यश सोलापूर – येथील सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. भक्ती शंकर कल्पवृक्ष हिने जेईई मेन परीक्षेत ९३.२५ टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. ती जेईई डव्हॉन्स परीक्षेसाठी पात्र झाली आहे. कु. भक्तीच्या या यशाबद्दल सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. अभ्यासातील सातत्य आणि सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे कु.भक्तीने सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी म्हणाले की, कु. भक्तीचे कठोर परिश्रम आणि महाविद्यालयातील अनुभव संपन्न शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश मिळालेले आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी भक्ती कल्पवृक्ष हिने मिळवलेले यश इतर विद्यार्थिनीं-साठी प्रेरणादायक आहे. तिचा आदर्श घेऊन विद्यार्थिनींनी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
याच कार्यक्रमात अकरावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचा अकरावीचा निकाल १००% लागला आहे. कु. पौर्णिमा चव्हाण (९३%) गुण मिळवून विज्ञान विभागातून आणि महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तर कला विभागातून कु. साक्षी काळे (८५%) आणि वाणिज्य विभागातून कु. प्रगती गायकवाड (८४%) यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शीला मिस्त्री, सचिव वीणा पतकी, कार्यकारणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, शंकर कल्पवृक्ष, विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. प्रा. सविता मादळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


