जीवन अनमोल आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाहतुकीच्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. वाहनात बसलेल्या प्रत्येक प्रवाशाचे जीवन वाहन चालकाच्या हातात असल्याने वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांच्या जाणीव व जागृतीचे काम हे केवळ वाहतूक पोलिसांचे नसून ते प्रत्येक विभागाचे आणि व्यक्तीचे आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना वाहतुकीच्या नियमांचे धडे शाळांमधून मिळावेत, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केले. येथील सेवासदन प्रशालेत रस्ता सुरक्षा अभियान सह वाहतुक सुरक्षा सप्ताह रस्ता सुरक्षा अभियान २०२५ याप्रसंगी सेवाशधन संस्थेच्या सचिव विणा पत्की, संस्थेचे संचालक पद्माकर कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे, वाहतूक शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण पारडे, वाहतूक पोलीस हवालदार ए. सी. पोळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी संचालक पद्माकर कुलकर्णी यांनी वाहतूक नियमांच्या विषयी माहिती सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेतील आर.एस.पी.चे शिक्षक रेवणसिद्ध कट्टे यांनी सूत्रसंचालन केले. भावी जीवनासाठी दिल्या शुभेच्छा खिरडकर म्हणाले, आता सोलापूर शहर बदलत्या काळात वाहन चालविण्यासाठी वयही बदलले आहे. तुमची-माझी पिढी ज्या वयात सायकललाही हात लावताना विचार करायची, त्या वयात आताची मुले वाहने चालवू लागली आहेत. सोलापूर शहरातील सध्याची वाहतूक समस्या आणि त्यावर कोणकोणते उपाय केले जात आहेत, या विषयाची माहिती त्यांनी विद्यार्थिनींना सांगितली. यासोबत विद्यार्थिनींनी चांगले काय आणि वाईट काय कसे ओळखावे हे सांगून त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

