सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथमा आणि प्रवेश परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थिनींनी परीक्षा दिल्याबद्दल व सुयश संपन्न केल्याबद्दल सोलापूरतील सेवासदन प्रशालेचा महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या वतीने डॉ.न.म. जोशी मराठी भाषा संवर्धन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार प्रशालेतील सहशिक्षिका डॉ. प्रिया निघोजकर यांनी स्वीकारला. महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या वतीने प्रथम या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. पुणे विभागातून सोलापूरच्या सेवासदन प्रशालेतून ३०० विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली होती. एकाच प्रशालेतून बहुसंख्येने विद्यार्थिनी परीक्षेस बसवून भाषा संवर्धनासाठी योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार सेवासदन प्रशालेला देण्यात आला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि ख्यातनाम वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सेवासदन प्रशालेच्या सहशिक्षिका डॉ. प्रिया निघोजकर यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. यावेळी साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि परीक्षा विभाग प्रमुख माधव राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी वाढावी आणि मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांची जाण प्रगल्भ व्हावी यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद च गेली अनेक वर्षे या परीक्षा घेत असते. विद्यार्थिनींना प्रोत्साहित केल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल सहशिक्षिका डॉ. प्रिया निघोजकर यांचाही महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष शीला मिस्त्री, उपाध्यक्ष डॉ. राजीव वीणा प्रधान, सचिव पत्की, प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि पालकांनी शाळेतील विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


