सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न


पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूरच्या सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम प्राचार्या श्रीमती वंदन जोशी उपस्थित होत्या. याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शीला मिस्त्री, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. मधुरा गोगटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून महाविद्यालयाची स्थापना, इतिहास, विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात मिळवलेलले यश, महाविद्यालयाची वाटचाल यांविषयी माहिती दिली.


या पारितोषिक वितरण समारंभावेळी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इयत्ता बारावी, जेईई, नीट, सीइटी इत्यादी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. याच वेळी महाविद्यालयाच्या दशकपूर्ती महोत्सवाच्या शुभारंभानिमित्त मान्यवरांच्या हस्ते दशकपूर्ती बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.


याप्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती वंदन जोशी यांनी “कोणत्याही स्पर्धेत यश मिळवायचे असेल तर प्रथम वेळेचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासास प्रथम प्राधान्य देणे, सोशल मिडियापासून स्वतःला रोखणे व कोणत्याही समस्या हलक्यात न घेता त्या संदर्भात पालकांशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्यातील वाटचालीत उत्तुंग यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, चिकाटी हे गुण अंगीकारावेत.” या शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया केसकर व प्रा. गीता मोहोळकर यांनी केले. तर प्रा. पद्मकुमार उपाध्ये यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी, पालक महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.